स्वच्छ रेडिओ नवी मुंबई

सोमवार 6 एप्रिल 2020 पासून दररोज

कोव्हिड – 19 च्या जनजागृतीकरिता “स्वच्छ रेडिओ नवी मुंबई” हा अभिनव इंटरनेट रेडिओ

कोव्हिड – 19 बाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने विविध माध्यमांचा वापर केला असून आता यामध्ये इंटरनेट रेडिओ या अभिनव उपक्रमाची भर पडत असून स्वत:चा “स्वच्छ रेडिओ नवी मुंबई” अशाप्रकारे इंटरनेट रेडिओ सुरु करणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका ठरणार आहे.

जगभर कोरोना विषाणूने थैमान घातलेले असताना रेडिओसारख्या प्रभावी माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचण्याचा हा नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आगळा वेगळा ठरत आहे. सोमवार 6 एप्रिल 2020 रोजी दुपारी 12 वाजता स्वच्छ रेडिओ नवी मुंबई प्रसारित केला असून नवी मुंबईकर नागरिकांसाठी तो समर्पित आहे. नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या संदेशाव्दारे कोव्हिड – 19 विरोधातील लढ्यासाठी नागरिकांना सज्जतेचे आवाहन करीत लॉकडाऊनच्या काळात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपण स्वत:च्या घरातच थांबून आपले योगदान द्यावे असे सूचित केले आहे.

हा “स्वच्छ रेडिओ नवी मुंबई” नागरिकांसाठी लाईव्ह करण्यात आला असून. नागरिकांनी “स्वच्छ रेडिओ नवी मुंबई” ऐकण्यासाठी ॲप (Swachh Radio Navi Mumbai) गुगल प्ले स्टोर वरुण डाउनलोड करा  https://play.google.com/store/apps/details?id=com.radio.Swachhh&hl=en

नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षामार्फत ग्लोबल ग्रीन इनोव्हेटर्स प्रा.लि. यांच्या कल्पक युवकांच्या सहयोगाने हा इंटरनेट रेडिओ सुरु करण्यात आला असून याव्दारे कोव्हिड – 19 प्रतिबंधासाठी घ्यावयाची आवश्यक काळजी आणि कोरोना संदर्भातील नागरिकांमध्ये असलेले समज, गैरसमज दूर करण्यासाठी तसेच केंद्र व राज्य सरकार प्रमाणेच महापालिकेच्या वतीने या करिता करण्यात येत असलेल्या उपाययोजना, पुरविण्यात येणा-या सेवासुविधा यांची माहिती शहरातील नागरिकांपर्यंत पोहचविली जाणार आहे. त्याचप्रमाणे यापुढील काळातही महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या स्वच्छता अभियान व इतर कामांच्या माहिती प्रसारणासाठी स्वच्छ रेडिओ नवी मुंबई कार्यान्वित असणार आहे.

इंटरनेट रेडिओची हि अभिनव संकल्पना राबविण्यासाठी ग्लोबल ग्रीन इनोव्हेटर्स प्रा.लि. कंपनीच्या जसपाल सिंह नेओल, बिनॉय के, निखिल एम,देवेंद्र सिंह, पुष्कराज म्हात्रे आणि मच्छिंद्र पाटील, हार्ट फौंडेशन संस्थेचे डॉ. जयकर एलीस आणि रिगग्रो डिजिटल या तांत्रिक कंपनीचे राकेश श्रीवंश यांचे योगदान लाभलेले आहे.

इंटरनेट रेडिओ ही नव्या जमान्याला साजेशी संकल्पना राबवून नवी मुंबई महानगरपालिकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जनजागृतीसाठी वापर करून आणखी एक माहितीपूर्ण यशस्वी पाऊल टाकले आहे. तरी नवी मुंबईकर नागरिकांनी “स्वच्छ रेडिओ नवी मुंबई” ऐकण्यासाठी ॲप (Swachh Radio Navi Mumbai) गुगल प्ले स्टोर https://play.google.com/store/apps/details?id=com.radio.Swachhh&hl=en या संकेत स्थळावरून स्वच्छ रेडिओ नवी मुंबई ची लिंक डाऊनलोड करावी असे आवाहन करण्यात येत आहे.